प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज
जन्म: श्रावण कृ।।५, इ.स.१८५४
समाधी: चैत्र व।। ६ ई.स. १९१३
प.प. श्रीस्वामी महाराजांचे उपलब्ध समग्र वाड्मय PDF या फोर्मेट मध्ये डाउनलोड करण्यास उपलब्ध आहे.
प.प. श्रीस्वामी महाराजांचे
चरित्र चिंतन
डाउनलोड करा.
ले: डॉ. वा. व्यं देशमुख
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज की जय!
श्री क्षेत्र माणगाव (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथे सन १८५४ मध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा टेंबे घराण्यात जन्म झाला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. "निसर्गाकडे चला" असा संदेश त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरुन अनुभवाला येतो.
त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली. श्री स्वामी महाराजांचा समाधी शताब्दी सोहळा नुकताच भारतात सर्व ठिकाणी साजरा झाला. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा विश्वशांतीमंत्र जगाला देवून त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजराथ या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे. आजच्या विज्ञान युगात मानव हा एक यंत्र बनू लागला आहे. शाश्वत चिरंतन मूल्याची अवहेलना होत आहे. वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी मानसिक दौर्बल्य वाढत चाललेले आहे. वरवर सुखी समाधानी, दिसणारा समाज अंतर्यामी दु:खी, खिन्न, उदासीन आहे. या दोन्ही गोष्टीतील तफावत कशी कमी होणार ? अशा प्रश्नांची उत्तरे म्हणजे स्वामी महाराजांचे जीवन चरित्र व वाङ्मय आहे. भौतिक प्रगती बरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.
श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार, सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती. श्रीस्वामीमहाराजांनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुध्द प्रवाह प्रवाहित झाला. ईश्वरीप्रेरणेने सिद्धप्रज्ञेतून स्फुरलेली ही त्यांची वाङ्मयसंपदा म्हणजे आधुनिक काळातील 'ईश्वरी लेणे' आहे. वेद-उपनिषदातील ऋषीमुनीची आठवण करून देणारे श्री स्वामीमहाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्व, त्यांचे लोकसंग्रहात्मक ईश्वरी अवतारकार्य आणि त्यांची दैवी वाङ्मयसंपदा ही भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासकांना ध्येयदृष्टी देणारी आहे. प्रबंधात्मक संशोधनाचा साधक, आणि उपासक, आर्त, अर्थार्थी अशा भक्तांना प्रेरणा व अमृतानुभव मिळावा, तसेच जिज्ञासूंना परिचय व्हावा म्हणून ५५०० पृष्ठांचे वाङ्मय श्री स्वामी महाराजांनी दत्त प्रभूंच्या कृपेने तयार केले.
श्री स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प.पू. श्री योगिराज गुळवणी महाराज व प.पू. श्री ब्रह्मश्री दत्त कवीश्वर महाराज यांनी सन १९५४ मध्ये १२ खंड ९ ग्रंथात संकलन करून श्री स्वामींची वाङ्मयीन मूर्तीच जणूकांही जगापुढे ठेवली. त्यानंतर समाधी शताब्दी वर्षाचे औचित्य लक्षात घेवून हे वाङ्मय 'जसेच्या तसे' ५५०० पृष्ठांचे (१२ खंड ९ ग्रंथ) वाङ्मयांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री वासुदेव निवास पुणे या संस्थेने सन २०१४ मध्ये प्रसिध्द केले आहे. हे सर्व वाङ्मय फक्त १५०० रुपयामध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण वाङ्मय हे लोकांसमोर यावे या हेतूने श्री वासुदेव निवास व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच आयोजित केले गेले. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मयामध्ये स्वामी महाराजांचे योगदान असा विषय होता. या चर्चासत्रात विविध प्रांतातून आलेल्या अभ्यासकानी मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषेतून विचार मांडले. 'ज्ञानदान हेच श्रेष्ठ' असे श्रीकृष्णानी सांगून ठेवले आहे. यावरून सिद्धग्रंथाचा प्रचार झाला पाहिजे असे सिद्ध होते. सिद्धपुरुषाचे वाङमयस्वरूप आपल्या घरामध्ये राहून परिवाराचे कल्याण करण्याकरीता संग्रही असणे आवश्यक आहे. श्री स्वामी महारांजांच्या सान्निध्यात ''अजी आनंदी आनंद मनी भरला पूर्णानंद" याचा अमृतानुभव घेवू या.