प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामिमहाराज यांच्या उपलब्ध सर्व वाङ्मयाचे प्रकाशनकार्य श्री. प. प. स्वामिमहाराजांचे शिष्यप्रवर प्रातःस्मरणीय योगीराज श्रीगुळवणीमहाराज यांनी ५० वर्षांपूर्वी श्रीस्वामिमहाराजांच्या जन्मशताब्दिमहोत्सवाच्या शुभपर्वणीच्या समयीं, प.पू. ब्रह्मश्री विद्यावाचस्पति श्रीदत्तमहाराज कवीश्वर आणि इतर स्वामिभक्तांच्या सहकार्याने संपन्न केले. यांतील बरेंच वाङ्मय वेळोवेळी निरनिराळ्या संस्थांनी प्रकाशित केले आहे. गेल्या दोन वर्षांत श्रीस्वामीमहाराजांच्या सार्धजन्मशताब्दीच्या पर्वणीत त्यांच्या ह्या यशःकायेचे पुनरुज्जीवन झाले आहे. त्याआधीच प्रस्तुत संगणकधामाच्या (Website) माध्यमांतून हे सर्व साहित्य करून देण्यांत आले आहे. हा अमोल वारसा जपण्यासाठी अशा आधुनिक साधनांचा उपयोग प्रभावी ठरेल ही भावना त्यामागे आहे. प.प. श्रीस्वामिमहाराजांचे वाङ्मय "अनन्यसाधारण, श्रीशप्रेरणेने निर्माण झालेले, स्वयंस्फूर्त, प्रसन्न, ईशप्रसादयुक्त, ग्राहकांना फलद्रूप होणारे, सर्वत्र प्रसिद्धीस पावून सर्वांना पटणारे असे सहज आविर्भूत झालेले आहे ....... गुरुमहाराज हे ईश्वरी अवतार असल्याने त्यांचे काव्य अधिकारीवाणीरूप अर्थात् निखिलादरणीय, इष्टापादक असेच आहे यांत संशय नाही." या प.पू.धुंडीराजमहाराज कवीश्वर यांच्या शब्दांपेक्षा श्रीस्वामिमहाराजांच्या वाङ्मयाचे अधिक समर्पक वर्णन करणे अशक्यप्राय आहे. |
१९व्या शतकांत कोंकणातल्या एका लहान खेड्यात, गरीब ब्राह्मण कुटुंबांत जन्म घेतलेल्या, शिक्षणासाठी कुठेही बाहेर न गेलेल्या, कुठलाहि ग्रंथसंग्रह उपलब्ध नसलेल्या एका संन्याशाने, सर्व भारतभर प्रवास करीत. अनेक व्याधींना तोंड देत, अत्यंत कठिण व्रतांचे कांटेकोर आचरण करीत, तहान-भूक, उपास-तापास, ऊन-पाऊस ही द्वंद्वे सहन करीत, हे अलौकिक वाङ्मय निर्माण केले आहे. आज शतकाधिक वर्षांनी ते केवळ टिकूनच आहे असे नाही तर हजारों आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू दत्तभक्तांना आश्रयभूत झालेले आहे. प्रकांड पंडितांनी त्यांच्या वाङ्मयाची विस्ताराची, व्यापकतेची, गहनतेची, प्रासादिकतेची आणि विविधतेची तुलना श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या वाङ्मयाशी केलेली आहे. मुख्यतः मराठी आणि संस्कृत भाषांतून श्रीस्वामिमहाराजांनी आपल्या दिव्य आणि चतुरस्र प्रतिभेचे दर्शन घडविले आहे. श्रीदत्तप्रभू आणि त्यांचे कलियुगांतील दोन अवतार श्रीपादश्रीवल्लभ व श्रीमन्नृसिंहसरस्वती यांची चरित्रे, स्वरूप, तत्त्वज्ञान, कार्य आणि मुख्य म्हणजे उपासना हेच या वाङ्मयाचे विषय होत. सर्व प्रकारच्या दत्तभक्तांना आपापल्या अधिकारानुरूप परमार्थमार्गाचे पाथेय श्रीस्वामिमहाराजांनी निर्माण केले आहे - नव्हे श्रीद्त्तभगवंतांनीच त्यांच्या माध्यमांतून निर्माण करविले आहे. अति सरल गेय भक्तिरसपूर्ण अशी मराठी पदे जशी त्यांनी केली तशाच नाना वृत्तांनी सुबद्ध आणि विविध अलंकारांनी सजलेल्या संस्कृत रचनाही केल्या. श्रीगुरुचरित्र आणि श्रीदत्तचरित्र यांच्यांत तात्त्विक प्रमेये त्यांनी उकलून दाखविली तशीच श्रीदत्तसंप्रदायांतील गूढ परमार्थसाधनेही प्रकट केली. त्यांच्या या विस्तृत, लोकोपकारक, श्रीदत्तसमर्पित वाङ्मयाचा हा एक विहंगम आलेख! |